Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बंधपत्राचा भंग करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट तुरुंगात

बंधपत्राचा भंग करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट तुरुंगात

रत्नागिरी:- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता अधिक आक्रमक झाले आहे. चॅप्टर केसमध्ये दिलेल्या बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन करणे आणि दंडाची रक्कम न भरणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. साहील समीर सोलकर (वय २६, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) या तरुणाला उर्वरित कालावधीसाठी दिवाणी तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साहील सोलकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत बी एन एस एस कलम १४१ (१) (ख) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सुनावणी दरम्यान त्याने बंधपत्र (Bond) भंग केल्याचे स्पष्ट झाले, ज्यासाठी त्याला दंड ठोठावण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने साहील याला दंड भरण्यासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून सवलत आणि पुरेसा वेळही दिला. सुरुवातीची २५ हजार रुपये दंडाची रक्कम कमी करून 10 हजार रुपये करण्यात आली होती.

यासाठी नोव्हेंबर २०२५ पासून जानेवारी २०२६ पर्यंत वारंवार संधी देण्यात आली. एकूण १० सुनावणींपैकी साहील हा ५ वेळा गैरहजर राहिला होता. जेव्हा त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी वॉरंट काढले गेले, तेव्हा त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता मिळून आली नाही. तसेच त्याचा जामीनदारही रक्कम भरण्यास असमर्थ ठरला.

साहील सोलकर याने वारंवार संधी देऊनही दंडाची रक्कम भरली नाही किंवा योग्य उत्तर सादर केले नाही. अखेर, अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. बी. बी. महामुनी यांनी कठोर पवित्रा घेत साहील याला दिनांक 3 जुलै २०२६ पर्यंत किंवा दंडाची रक्कम भरेपर्यंत दिवाणी तुरुंगात साध्या कारावासात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची रवानगी जिल्हा विशेष कारागृह, रत्नागिरी येथे करण्यात आली आहे.