राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
राजापूर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत १ कोटी ९१ लाख ९६ हजार रुपये किमतीचा गोवा राज्यनिर्मित बेकायदेशीर दारूसाठा आणि कंटेनर जप्त केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मौजे पन्हाळी तर्फे सौंदळ येथील हॉटेल समर्थजवळ, गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलमय भागात लपवून ठेवलेल्या एका सहाचाकी कंटेनरवर छापा टाकून ही विक्रमी कारवाई करण्यात आली.
१ कोटी ६९ लाखांची गोवा व्हिस्की जप्त
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेला ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचा प्रचंड साठा मिळून आला. कंटेनरमध्ये एकूण १६०० पुठ्याचे बॉक्स (१३,८२४ बल्क लिटर) आढळून आले. या जप्त केलेल्या अवैध दारूची मूळ किंमत १ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपये आहे.
तपासणीदरम्यान या सहाचाकी लेलँड कंटेनरवर प्रथमदर्शनी राजस्थानचा (R) 14 GR 6004) बनावट नंबर प्लेट लावल्याचे दिसून आले. मात्र वाहनाची सखोल तपासणी केली असता त्या खाली कंटेनरचा मूळ क्रमांक हरियाणाचा (HR 69 E 3490) असल्याचे निष्पन्न झाले. छापा पडताच कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता श्रीकर आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान अतुल वसावे, विशाल विचारे, मानस पवार आणि अनुराग बर्वे यांनी ही यशस्वी कारवाई केली. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य साठा अथवा बनावट माडीची विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ व्हॉट्सअॅप क्र. ८४२२००१९३३ किंवा १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









