राजापुरात रिक्षा आडवून कोयत्याने हल्ला

दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील विलये-गुरववाडी येथे रिक्षेला आडवे होऊन चालकावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जखमी व्यक्ती आपल्या काकांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मांडवकर बंधूंवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप दौलत गुरव (वय ३३, व्यवसाय: शेती व रिक्षा चालक) हे मंगळवारी (२४ मार्च) रात्री ९:३० च्या सुमारास आपले चुलते सुभाष गुरव यांना उपचारासाठी रिक्षाने दवाखान्यात घेऊन जात होते. रिक्षा गुरववाडीतून जात असताना, आरोपी गणपत दत्ताराम मांडवकर हा रिक्षेसमोर आडवा आला आणि त्याने संदीप यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संदीप यांनी विचारणा केली असता, आरोपी गणपत हा घरातून दोन कोयते घेऊन बाहेर आला. यावेळी त्याचा भाऊ राजेंद्र दत्ताराम मांडवकर याने संदीप यांना समोरील बाजूने पकडून ठेवले आणि हाताने मारहाण केली. याचवेळी गणपत मांडवकर याने हातात असलेल्या कोयत्याच्या मागील बाजूने संदीप यांच्या डाव्या खांद्यावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले.

​काही वेळाने फिर्यादीचा भाऊ प्रफुल्ल गुरव हा तिथे पोहोचला असता, आरोपी गणपत मांडवकर याने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. तो हातात कुऱ्हाड घेऊन आला आणि “आता तुम्हा दोघांनाही ठार करतो,” अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत निर्माण केली.

​या गंभीर घटनेनंतर संदीप गुरव यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मांडवकर बंधूंविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या ​कलम ११८(१), ​कलम ११५(२), ​कलम ३५२, ​कलम ३५१(१), ​कलम ३(५) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.