रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमींमधील अंतिम संस्काराचे दर वाढवण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूरी दिली. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या गावांतील गरीबांना आता कमीत कमी पाच ते सहा हजार रुपयांची बचत ठेवून जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. शहरातील मृतदेहाच्या अग्निसाठी लागणाऱ्या लाकडांना 1500 रुपये, शहरा बाहेरच्या मृतदेहासाठी 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस शवदाहिनीसाठी शहरातील मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी 1000 रुपये तर शहराबाहेरच्या मृतदेहासाठी 2000 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी यापूर्वीच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत अग्निशमन आणि दिवाबत्ती कर आकारणी ठराव मंजूर झाले. एकत्रित मालमत्ता कराच्या 2 टक्के अधिक कर आता पुढच्या वर्षापासून वाढणार आहेत. यातील अग्निशमन कर लावू नये अशी लेखी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तीन नगरसेवकांनी केली. दिवाबत्ती कराला मात्र शिवसेना-भाजप युतीसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनीही मंजूरी दिली आहे. स्वच्छता सेवा कराचा विषय मात्र स्थगित ठेवण्यात आला आहे. गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आता अंतिम संस्काराचे दर वाढवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांबाबत सुधारीत दर निश्चित करण्याबाबतचा विषय सर्वसाधारण सभेसमोर आला. या विषयासंदर्भात कार्यालयीन टिपणी वाचण्यात आली तेव्हा मृतदेह अंतिम संस्कारासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च होतो असे सभा अधिक्षक जितेंद्र विचारे यांनी सभागृहाला सांगितले. त्यानंतर सुधारीत वाढीव दर वाचण्यात आले.
स्मशान भूमीतील लाकडांसाठी शहरासाठी पूर्वी 1 हजार रुपये आणि शहरा बाहेरील मृतदेहासाठी 2 हजार रुपये आकारले जात होते. त्याचबरोबर गॅसचे व दाहिनीचे शहरातील मृतदेहासाठी 500 रुपये तर शहरा बाहेरील मृतदेहासाठी 1 हजार रुपये आकारले जात होते. आता हे दर स्मशान भूमीतील मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी शहरातील मृतदेहाच्या विधीसाठी 1 हजार 500 रुपये तर शहरा बाहेरील मृतदेहाच्या विधीसाठी 2 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आले. या सुधारीत वाढीव दरांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूरी दिली आहे.
शहरातील मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशान भूमीत वाहनाने नेण्यासाठी भाडे लागते. त्याचबरोबर इतर धार्मिक विधीसाठी खर्च होत असतो. त्यात आता अंतिम संस्काराच्या वाढीव दरांची भर पडली आहे. त्यामुळे महागाईशी झगडत जीवन जगणाऱ्यांना मृत्यूही महाग झाला आहे.









