रत्नागिरी प्रशांतनगर येथे घरासमोरून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- शहरातील प्रशांतनगर विमानतळ परिसरामध्ये घराबाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांतनगर विमानतळ परिसरात प्रकाश अनंत रेवाळे यांच्याकडे भाड्याने राहणारे शेखर प्रकाश भोबल (वय ३३) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेखर यांनी आपली होंडा कंपनीची सी.बी. शाईन मोटार सायकल (क्र. MH 08 AT 2093) राहत्या घराच्या पार्किंगमध्ये लावली होती. रात्रीच्या वेळी संधी साधून अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लंपास केली.

दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेखर भोबल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. प्रशांतनगर आणि विमानतळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, याचा शोध पोलीस घेत असून चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.