रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकण नगर चौकीच्या पथकाने गुरुवार 30 एप्रिल रोजी पहाटे शिळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात काही ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होते. गुरुवार ३० एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास शिळ मिरजोळे भागात पेट्रोलिंग सुरू असताना, पोलिसांना संशयीत इसम स्वरुपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी) हा गावठी दारू तयार करताना रंगेहात मिळून आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ८९,०५० रुपये किमतीचे गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन आणि तयार गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सपोनि तानाजी पवार, पोउपनि सागर शिंदे.सपोफौ दीपक साळवी, राजेंद्र सावंत, मपोहेकॉ अमिता पाटील, पोहेकॉ उमेश पवार, भालचंद्र मयेकर. पोकॉ अमित पालवे आणि निलेश शिंगवे आदी उपस्थित होते.









