Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण

राजापूर विलये मिराशीवाडी येथील घटना

राजापूर:-  तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथे जमिनीच्या आणि बागेच्या मालकीवरून झालेल्या वादासंदर्भात एका ६१ वर्षीय शेतकऱ्यावर भावाने आणि भाऊजयने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामदेव धोंडु तावडे (वय ६१, रा. विलये मिराशीवाडी, ता. राजापूर) हे सर्वेश संतोष परवडी यांच्यासह सामाईक जागेतील डोंगर तिठा येथील बागेची साफसफाई करून घरी परतत होते. त्यावेळी त्यांचे भाऊ सुरेश धोंडु तावडे (वय ७२) आणि भाऊजय सुहासिनी सुरेश तावडे (वय ६०) यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

भाऊ सुरेश याने फिर्यादीला “तू या बागेत पाऊल टाकायचे नाही, तू चोर आहेस” असे म्हणून अपमानित केले. त्यानंतर दोघांनी मिळून फिर्यादीच्या हातातील पिशवी ओढून त्यातील दोन कोयते काढून घेतले. सुरेश याने फिर्यादीला धरून ठेवले असता, भाऊजय सुहासिनी हिने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर कोयत्याने वार करून दुखापत केली.

हल्ल्यात फिर्यादी खाली पडल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छाती व पाठीवर मुका मार दिला. तसेच, संशयित आरोपी सुरेश याने खाली पडलेल्या फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. जाताना “ही आमची बाग आहे, तुझे इथे काही नाही, तू खाली जा, जर बागेत परत आलास तर तंगड्या मोडून टाकीन,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांना दमदाटी केली.

याप्रकरणी फिर्यादी नामदेव तावडे यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.