६,००० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार
रत्नागिरी:- ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट व विनम्र सेवांच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची कमान उंचावत अर्धवार्षिक अहवालानुसार (३० सप्टेंबर २०२६ अखेर) ६,००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या कालावधीत बँकेने ४९ कोटी १३ लाख ३६ हजार इतका नफा मिळवला असून, गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत नफ्यात ₹१० कोटी ७४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकिक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकसेवा आणि आधुनिकतेला प्राधान्य दिले आहे. बँकेने डिजिटलायझेशनवर विशेष भर दिला असून, सध्या ग्राहकांसाठी अनेक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याचबरोबर, बँक लवकरच एईपीएस सुविधा कार्यान्वित करत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना एईपीएस सुविधा देणाऱ्या राज्यातील ३ निवडक जिल्हा बँकांपैकी रत्नागिरी जिल्हा बँक एक ठरणार आहे.
गतवर्षीपेक्षा ठेवी, कर्ज आणि नफा या तिन्ही क्षेत्रांत लक्षणीय वाढ झाल्याबद्दल बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळ यांनी बँकेचे सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतकांचे आभार मानले. बँकेवर असाच दृढ विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय आणि बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळेच बँकेला हे दैदिप्यमान यश प्राप्त झाले आहे.”
बँकेने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.









