रत्नागिरीत 15 दिवसात 960 कुत्र्यांची नसबंदी

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेने पुन्हा कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये 15 दिवसांच्या टप्प्यात शहरातील 960 कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करण्यात आले. पालिकेने त्यासाठी 15 लाख 14 हजार खर्च केले आहेत. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येणार असून, लसीकरणामुळे कुत्री पिसाळण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

रत्नागिरी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. अगदी टोळक्याने ही कुत्री शहरात नाक्यानाक्यावर असतात. दुचाकी असो वा चारचाकी त्याचा पाठलाग करतात. रात्री-अपरात्री बाहेर पडण्याची भीती असते. कारण, हे कुत्रे कधीही हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरात एकप्रकारे या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोगही झाला होता. कुत्र्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नसबंदी करून त्यांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव मार्ग असल्याने पालिकेने कुत्र्यांची दहशत कमी करण्यासाठी नसबंदी आणि लसीकरण हे दोन्ही उपाय अवलंबले आहेत.

पालिकेने त्यासाठी सुमारे 15 लाख 14 हजार खर्च करून कोल्हापूरच्या सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन एजन्सीला नसबंदीचा ठेका दिला आहे. प्रत्येक कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी 1650 रुपये ही एजन्सी घेते. एप्रिल महिन्यात पंधरा दिवसांमध्ये एजन्सीने 213 कुत्रे (नर) आणि 232 मादी असे एकूण 445 कुत्र्यांची तर 1 ते 15 मेपर्यंत 256 कुत्रे आणि 258 मादी कुत्रे असे 515 कुत्र्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण केले.