Saturday, May 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंब्याजवळ गॅस टँकर उलटून अपघात; मोठी दुर्घटना टळली

हातखंब्याजवळ गॅस टँकर उलटून अपघात; मोठी दुर्घटना टळली

अपघातानंतर काही वेळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील चरवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणत्याही प्रकारची गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना चरवेली गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा गॅस टँकर रस्त्यावर उलटला. गॅस टँकर असल्यामुळे परिसरात सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने तपासणी केली असता टँकरमधून कोणत्याही प्रकारची गॅस गळती होत नसल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्गावरील धोका टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली. अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी मोठ्या क्रेन पाचारण करण्यात आल्या. वाहतूक पूर्ववत: क्रेनच्या साहाय्याने टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला असून, काही काळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे.