Sunday, June 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न: अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न: अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी:- महाराष्ट्रात सुमारे २ लाख सहकारी संस्था कार्यरत असून, संचालक, कर्मचारी आणि सभासदांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्य पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रशिक्षण केंद्र शिर्डी येथे आहे. परंतु, सर्वच भागांतून तेथे प्रशिक्षणासाठी जाणे शक्य होत नसल्याने, विभागातच स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नूतन अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोकणातून पहिल्यांदाच या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याचे सांगत विविध संकल्पना मांडल्या. रत्नागिरीत पतसंस्था चळवळीच्या बळकटीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी दर महिन्याला एक अभ्यासक्रम तयार करून प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळून कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी दर्शवला. तसेच रत्नागिरीत गणपतीपुळे येथे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र व विविध विभागांमध्ये उपकेंद्रे उभारण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना असून, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड. पटवर्धन यांनी पुढे नमूद केले की, अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. सध्या पतसंस्थांपुढे ठेव ठेवींवरील अंशदान आणि सहकार खात्याने केलेली आर्थिक तरतूद यांबाबत अनेक अडचणी आहेत. २०१७ पासून प्रलंबित असलेल्या या त्रुटी व अडचणी सोडवण्यासाठी नवीन परिपत्रके मिळवण्याकरिता मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला जाईल. पतसंस्थांनी आपले डॉक्युमेंटेशन व रेकॉर्ड अद्ययावत आणि व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या चळवळीत नियमितता राहून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल.
फेडरेशनच्या या निवडणुकीत २१ संचालकांना अध्यक्षपदाची संधी उपलब्ध होती. मात्र, सर्वांनी मिळून माझ्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करत माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांनी सर्व संचालकांचे मनःपूर्वक आभार मानले. राज्यात आजच्या घडीला १९९८ च्या कायद्यानुसार विविध प्रकारच्या पतसंस्था कार्यरत असून, यामध्ये तब्बल ६ कोटी सभासद जोडलेले आहेत. सुमारे ९० हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थांकडे जमा असून, संपूर्ण महाराष्ट्रात ३ हजारहून अधिक पतसंस्था या फेडरेशनशी थेट संलग्न आहेत. हे जाळे अधिक विस्तारण्यासाठी आणि राज्यातील पतसंस्था चळवळ अधिक लोकाभिमुख व विश्वासार्ह करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी दिले.