रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावर भोके आंबेकरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात ७३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात आरोपी दुचाकीस्वार आणि त्याची पत्नीदेखील जखमी झाले आहेत.
मयत गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर (वय ७३, रा. भोके आंबेकरवाडी) हे ११ जुलै रोजी आपली ॲक्टिव्हा स्कुटर (एम.एच. ०८ टी ०४३७) घेऊन भोके ते खेडशीच्या दिशेने जात होते. भोके आंबेकरवाडी फाटा येथे ते रस्ता ओलांडत असताना, हातखंबा तिठ्याकडून निवळीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकलने (एम.एच. ०८/ए.एच./९५५४) त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, ॲक्टिव्हा स्वाराला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच, दुचाकी चालवणारा आरोपी अरझान मुस्ताक काझी (वय ३३, रा. कळंबस्ते) आणि त्याची पत्नी उर्मा अरझान काझी हे दोघेही या अपघातात जखमी झाले आहेत.
अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, १४ जुलै रोजी उशिरा रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी अरझान काझी याच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.का.) कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









