Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ५ मार्च २०२६ रोजी एका महत्त्वपूर्ण शासन निर्णयाद्वारे रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आणि निवासस्थानांच्या बांधकामासाठी तब्बल ४९३.९७ कोटी रुपयांच्या अवाढव्य अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हे भव्य प्रकल्प साकारण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश आले असून, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दारे आता आपल्या दारातच उघडली जाणार आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार होण्यास मोठी मदत होणार आहे.

या प्रकल्पाची व्याप्ती मोठी असून यामध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, परिचारिका निवासस्थाने आणि अधिष्ठात्यांसाठी स्वतंत्र बंगल्याचा समावेश आहे. एकूण ७७,६७६ चौरस मीटर क्षेत्रावर हे बांधकाम होणार असून यामध्ये केवळ इमारतीच नव्हे, तर लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही, अग्निशमन व्यवस्था आणि फर्निचर अशा सर्व आधुनिक सोयीसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘मेडिकल गॅस पाईपलाईन’, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि भव्य अंतर्गत रस्ते व पार्किंगची व्यवस्थाही या आराखड्यात आहे.
विशेष म्हणजे, हे काम अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत ‘टर्न की’ तत्वावर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे संपूर्ण काम पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयी ठेवून केले जाणार आहे.
या मान्यतेमुळे केवळ रत्नागिरीच नव्हे, तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही आणि गंभीर आजारांच्या उपचारासाठीही सर्व सोयी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. या ऐतिहासिक पावलामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत असून विकासाच्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे.