तांत्रिक कारणास्तव ‘कम्युनिटी सेंटर’ शब्दाचा वापर: मारुती कांबळे
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील ऐतिहासिक थिबा राजा पॅलेस परिसरातील बुद्धविहाराच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष मारुती कांबळे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे ट्रस्टची अधिकृत भूमिका स्पष्ट करत, या जागेवर केवळ आणि केवळ भव्य बुद्ध विहारच साकारले जाणार असल्याची ग्वाही दिली आहे. काही समाज बांधव तांत्रिक शब्दांचा आधार घेऊन जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
रत्नागिरी तालुक्यातील थिबा राजाकालीन ऐतिहासिक बुद्धविहार परिसराचा विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून समाज बांधवांकडून केली जात होती. यासाठी स्थापन झालेल्या ‘थिबा राजाकालीन बुद्धविहार स्थळविकास चॅरिटेबल ट्रस्ट’ने सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळून पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने १७.५० गुंठे शासकीय जमीन बुद्धविहारासाठी मंजूर करण्यात आली. मात्र, या कामासाठी शासकीय निधीची तरतूद करताना एक तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. शासकीय नियमांनुसार ‘बुद्धविहार’ या नावाने थेट निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद नसल्याने, प्रशासकीय स्तरावर तो निधी ‘कम्युनिटी सेंटर’ या शीर्षकाखाली मंजूर करण्यात आला आहे. केवळ निधी मिळवण्यासाठी हा शब्दप्रयोग तांत्रिकदृष्ट्या वापरला असला, तरी प्रत्यक्षात उभी राहणारी वास्तू ही पूर्णतः बुद्धविहारच असणार आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या विहाराचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले होते. असे असूनही, समाजातील काही ठराविक गट ही वास्तू बुद्धविहार नसून केवळ सामुदायिक केंद्र असल्याचे सांगून समाजात गैरसमज पसरवत आहेत. या अफवांच्या आधारे मोर्चे काढले जात असून, यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मारुती कांबळे यांनी पुढे सांगितले की, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमातही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, या जागेचे संपूर्ण व्यवस्थापन बुद्ध समाजाकडेच राहील आणि तिथे भव्य बुद्ध विहारच उभे राहील.
ट्रस्टच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, तांत्रिक शब्दांचा विपर्यास करून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. ही ऐतिहासिक वास्तू समाजाच्या अस्मितेचे प्रतीक ठरणार असून तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ट्रस्टची आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, सुहास कांबळे, कायदेशीर सल्लागार शिवराज जाधव, कोषाध्यक्ष प्रितम आहिरे यांच्यासह शशिकांत कांबळे, सुनील कांबळे, मिलिंद कांबळे, समीर जाधव, राहुल सावंत, नरेश कांबळे, तुषार पोवार, किरण पवार आणि सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.









