रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा येथे घरफोडी करण्यासाठी चोरटा घराचा कडी कोयंडा उचकटणार तेवढ्यात शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने शेजाऱ्यांनी आरडाओरडा करताच चोरटा पळाला. मात्र सराईत गुन्हेगार असल्याने संशयिताला जयगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. जलील अब्दुल्ला सोलकर (60, रा. कर्ला रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरूद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा 17 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास खंडाळा आदर्शनगर येथील घराचे कडी-कोयंडा उचकटण्याचा प्रयत्न करत होता. या गोष्टीची चाहूल या ठिकाणी वास्तव्य करणारे स्वप्नील भगवान कीर यांना लागली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून त्या ठिकाणाहून पळाला. मात्र पोलीस तपासामध्ये हे कृत्य संशयित जलील अब्दुल्ला सोलकर यानेच केल्याचे उघडकीस आले, त्यानुसार पोलिसांनी जलील सोलकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 457,380, 511 नुसार गुन्हा दाखल केला. संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.