Tuesday, September 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मोबाईल हॅक करून तेली आळी येथील सीएची ५.६६ लाखांची फसवणूक

मोबाईल हॅक करून तेली आळी येथील सीएची ५.६६ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमध्ये कार्यालयात असलेल्या चार्टर्ड अकाऊटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून त्याआधारे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवून घेतले. त्यानंतर संयुक्त बँक खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यासह मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैशांचे क्रेडिट कार्ड बिल भरून घेतल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी विपिन रसिकलाल शहा (वय ५७, व्यवसाय चार्टर्ड अकाऊटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ वाजण्याच्या सुमारास ही ऑनलाइन फसवणूक घडली. फिर्यादी विपिन शहा हे तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केल्याचा आरोप आहे. या मोबाईलचा गैरवापर करून संबंधित अज्ञात व्यक्तीने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड इश्यू करून घेतले.

त्यानंतर त्या डेबिट कार्डचा वापर करून फिर्यादी यांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता अज्ञात व्यक्तीने मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेचे क्रेडिट कार्ड बिलदेखील भरून घेतले. अशा प्रकारे एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.१९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून, मोबाईल हॅकिंग, डेबिट कार्डचा वापर आणि ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फसवणुकीचा पोलीस तपास सुरू आहे.