Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मुलीचे नाक-तोंड दाबत हत्या करणाऱ्या आईची पोलीस कोठडीत रवानगी

मुलीचे नाक-तोंड दाबत हत्या करणाऱ्या आईची पोलीस कोठडीत रवानगी

कुवारबाव-पारसनगर येथील घटना

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर येथे जन्मदात्या आईनेच़ सतत रडत असल्यामुळे पोटची मुलगी हुरेन आसिफ नाईक (8 महिने) हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हाताने तिचे नाक दाबत तिचा जीव घेतला. ही घटना बुधवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी संशयित महिला आणि त्या मुलीची आई शाहिन आसिफ नाईक (36) हिला अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

शाहिन नाईक ही लग्नानंतर अलोरे चिपळूण येथे रहात होती. काही दिवसांपूर्वी ती माहेरी रत्नागिरी येथील कुवारबाव-पारसनगर येथे रहायला आली होती. बुधवारी तिचे वडिल आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे शाहिनची लहान बहिण त्यांची देखभाल करण्यासाठी त्याठिकाणी गेली होती. घरात कोणीही नसल्याने सतत रडत असलेल्या हुरेन या आपल्याच मुलीचा राग आल्याने शाहिनने त्या रागाच्या भरात मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर तिचे नाक दाबले. त्यामुळे गुदमरुन हुरेनचा मृत्यू झाला.
दरम्यान, सायंकाळी उशिरा शाहिनची धाकटी बहिण जिल्हा शासकिय रुग्णालयातून वडिलांची देखभाल करुन घरी परतली. तेव्हा तिला हुरेनचा आवाज न आल्याने तिने बहिण शाहिनकडे विचारणा केल्यावर तिने हुरेन झोपली असल्याचे सांगितले. परंतू तिच्या बहिणीला शंका आल्याने तिने हुरेनला घेउन जिल्हा शासकिय रुग्णालय गाठले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी हुरेनला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी धाव घेत संशयित शाहिन नाईकला अटक केली.