वेरवली बुद्रुक येथील घटना; शिक्षिकेसह दोघांवर गुन्हा
लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे घरगुती चर्चेवरून झालेल्या गैरसमजातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून वृद्धेला आणि त्यांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित वृद्धेच्या नातीचाही घाणेरड्या भाषेत अपमान करण्यात आला असून, लांजा पोलीस ठाण्यात एका उच्चशिक्षित पती आणि शिक्षिका पत्नीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे रोजी सायंकाळी ४:१५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी दिपाली दीपक डोळस (वय ६७, रा. वेरवली बुद्रुक, ता. लांजा) या त्यांच्या घरी मुलगी रुपाली दीपक डोळस हिच्याशी घरगुती विषयावर चर्चा करत बोलत बसल्या होत्या.
या दरम्यान, शेजारी राहणारा संशयित आरोपी विशाल मारुती डोळस (वय ४४, शिक्षण- बीएससी) याने ‘तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय?’ असा स्वतःचा गैरसमज करून घेतला. याच रागातून त्याने थेट फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपी विशाल याने वृद्ध दिपाली डोळस आणि त्यांची मुलगी रुपाली या दोघींच्या कानाखाली हाताच्या थापटांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने दोघींचे केस ओढून आणि त्यांनी परिधान केलेले गाऊन ओढून त्यांना अमानुष मारहाण केली.
हा गोंधळ सुरू असतानाच आरोपी विशाल याची पत्नी गौरी विशाल डोळस (वय ४४, व्यवसाय- शिक्षिका) ही घराच्या अंगणात आली. तिने फिर्यादी यांची नात अनया नारकर हिला उद्देशून अत्यंत घाणेरडे अपशब्द वापरले. “तुझा बाप कोण? तुम्ही भांडी घासणारी लोक आहात, तुमच्या बापाचे काय आहे?” अशा खालच्या पातळीवर जाऊन तिने अनयाचा अपमान केला.
फिर्यादी दिपाली डोळस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींकडून मागील वर्षभरापासून असाच त्रास दिला जात आहे. या नाहक त्रासामुळे संपूर्ण कुटुंबाचे जगणे कठीण झाले असून, गुंड प्रवृत्तीच्या या संशयितांपासून आपल्या व कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी १५ मे रोजी रात्री ११:२८ वाजता लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विशाल मारुती डोळस आणि गौरी विशाल डोळस या पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११५(२), ३३२(ग), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.









