Wednesday, September 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी कारवांचीवाडी-खेडशी मार्गावर वाहतुकीला अडथळा; रिक्षा, दुचाकीचालकावर गुन्हा

कारवांचीवाडी-खेडशी मार्गावर वाहतुकीला अडथळा; रिक्षा, दुचाकीचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहने उभी करणाऱ्या रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश नागेश रजपुत (वय ४३, रा. रविंद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) यांची रिक्षा क्रमांक एमएच ०८ ए क्यू ४१९८ कारवांचीवाडी फाटा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर अशा स्थितीत उभी आढळून आली की, त्यामुळे इतर वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा तसेच अपघाताचा धोका निर्माण होत होता. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत बाळाराम महाडीक (वय ३५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रजपुत यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच मार्गावर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुसरी कारवाई करण्यात आली. सिद्ध सातलिंग कलशेट्ये (वय २२, रा. मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) यांची दुचाकी क्रमांक एमएच ०८ एएच ६३३३ रस्त्यावर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर चंद्रकांत साळवी (वय ४८) यांनी फिर्याद दिली. कलशेट्ये यांच्याविरोधातही भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.