रत्नागिरी:- तीन महिन्यांपूर्वी शहरातील मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे किरकोळ कारणातून कामगार प्रिन्स मंगरु निषाद (18, मुळ रा.जि. गोरखपूर,उत्तरप्रदेश सध्या रा.शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) या तरुणावर आरीने वार करत त्याचा खून करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने सशर्थ जामिन मंजूर केला.
निरज तेजप्रताप निषाद (40, मुळ रा.जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश सध्या रा.शांतीनगर नाचणे,रत्नागिरी) असे जामिन मंजूर करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात सुहेब हिदायत वस्ता (रा.झाडगाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी मयत प्रिन्य निषाद आणि संशयित निरज निषाद हे दोघेही फिर्यादीच्या मिरकरवाडा येथील नवीन मोबाईल शॉपीचे फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी प्रिन्स हा कामाच्या वेळी सतत प्रेयसी सोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणातून निरजचे त्याच्या सोबत भांडण झाले. रागाच्या भरात निरजने बाजूची आरी प्रिन्सच्या छातीत मारुन त्याचा खून केला. त्यानंतर निरज निषाद आणि त्याच कामावरील अन्य एक सहकारी अनूज चौरसिया याच्यासोबत त्याने तेथून पळ काढत रेल्वेस्टेशन गाठले होते.
परंतू शहर पोलिसांना खूनाची माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल लोकेशव्दारे ते रेल्वेस्टेशनला असल्याची माहिती मिळवत त्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणातील मुख्य संशयित निरज निषाद हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजंचू म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश 2, यांनी निरजला सशर्थ जामिन मंजूर केला. संशयित आरोपीच्या वतीने ॲड.आदेश चवंडे,ॲड. विवेक दुबे,ॲड.प्राजक्ता दुबे,ॲड.प्रतिक मुळ्ये, ॲड.यशराज सावंत आणि आर्यन सावंत यांनी काम पाहिले.









