मांडकी येथे राज्यातील पहिल्या ‘ग्रामीण, कृषी- सहकार साहित्य संमेलनाचा’ दिमाखात समारोप

चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील मांडकी–पालवण येथे राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा रविवारी उत्साहात आणि विचारमंथनाच्या वातावरणात समारोप झाला. शिक्षण, कृषी आणि सहकार या ग्रामीण विकासाच्या त्रिसूत्रीवर आधारित या अनोख्या संमेलनाने ग्रामीण भागातील प्रश्न, संधी आणि भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा घडवून आणली. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात साहित्यिक, कृषी तज्ज्ञ, सहकार क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

समारोपप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शिक्षणव्यवस्थेवर परखड भाष्य केले. “आज विविध क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि जीवनशैली बदलत आहे. अशा वेळी केवळ बौद्धिक शिक्षण देऊन चालणार नाही. तरुणांच्या पोटाचा प्रश्न सुटला नाही, तर देश महासत्ता होण्याची स्वप्ने फोल ठरतील. त्यामुळे शिक्षण देताना डोक्याबरोबरच पोटाचाही विचार झाला पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षण, कृषी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा त्रिवेणी संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य, कृषी व सहकार विषयक संमेलने स्वतंत्रपणे होत असली, तरी या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार करणारे हे संमेलन महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्राचे अनेकदा साहित्य, चित्रपट आणि कथांमध्ये नकारात्मक चित्रण झाले असले, तरी संपूर्ण सहकार चळवळीची प्रतिमा कलुषित करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये सहकार संस्थांचे मोठे योगदान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्रा. जोशी पुढे म्हणाले की, उच्च शिक्षण घेऊनही बेकारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. केवळ पदवीधर तयार करून चालणार नाही, तर उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त आणि कौशल्याधारित मनुष्यबळात रूपांतर झाले पाहिजे. शिक्षण आणि रोजगार यामध्ये समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन यावर भर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’ आणि ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयांवर परिसंवाद पार पडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणांचा सखोल ऊहापोह करण्यात आला. “शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचे मार्ग उपलब्ध असले, तरी परतफेडीच्या वेळी अतिवृष्टी, दुष्काळ, आजारपण, शिक्षण व लग्नखर्च यांसारख्या अडचणींमुळे ते कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतात. मात्र आत्महत्यांचे एकमेव कारण नापिकी किंवा कर्जबाजारीपणा नाही; हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही मोठे घटक आहेत,” असे प्रा. जोशी यांनी नमूद केले. साहित्यामध्ये जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या यशोगाथा यायला हव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई आणि डॉ. अकुश चोरमुले यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रयोगशील शेती पद्धती, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि यशस्वी वाटचालीच्या कथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्या. ग्रामीण भागातही आधुनिकतेची कास धरून प्रगती साधता येते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित या संमेलनात डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत यमाजी पालकर यांनी घेतली. जीवनातील संघर्ष, शिक्षणासाठी केलेली धडपड, संस्थेची उभारणी आणि ग्रामीण भागात शैक्षणिक चळवळ उभी करण्यामागील प्रेरणा यांचा प्रवास त्यांनी उलगडला. विविध विषयांवर परखड मत मांडताना त्यांनी मिश्किल शैलीत दिलेली उत्तरे सभागृहाला खळखळून हसायला लावत होती. आतापर्यंत स्वतःची ४९ पुस्तके प्रकाशित झाल्याचे सांगत “मी माझं गाव शोधतोय” या विषयावर ५० वे पुस्तक लिहित असल्याची माहिती त्यांनी दिली. संमेलनाचा उद्देश यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले. “ज्ञान असेल तर आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल तर शिकण्याची तयारी कायम राहते. यश मिळवण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. तरुणांनी शॉर्टकटचा मोह टाळून मेहनतीवर भर द्यावा,” असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांनी शेती, सहकार आणि उद्योग क्षेत्रात संधी शोधून स्वावलंबी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.

संमेलनाचे प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे यांनी सहभागी साहित्यिक, मान्यवर, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आमदार निकम आणि उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. संमेलनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या कृषी, पुस्तक व सहकार विषयक विविध स्टॉल्सना उत्तम प्रतिसाद मिळाला. स्थानिक उत्पादने, शेतीतील नव्या साधनांची माहिती आणि साहित्य विक्री यामुळे संमेलनाला व्यावहारिक स्वरूप लाभले.

समारोपावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी दोन महत्त्वाचे ठराव मांडले. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी शासनाने तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन संचमान्यता धोरण रद्द करून येथील मराठी शाळांना जिवदान द्यावे, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार या त्रिसूत्रीचा संगम घडवून आणणारे हे पहिलेच संमेलन असल्याने राज्यभरातून त्याची दखल घेण्यात आली. ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर साहित्यिक आणि तज्ज्ञांनी केलेले चिंतन भविष्यातील धोरणांना दिशा देणारे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. विचारमंथन, प्रेरणा आणि कृतीचा संदेश देत या ऐतिहासिक संमेलनाचा समारोप झाला.