Thursday, May 21, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूणच्या नांदिवसे परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीची डरकाळी

चिपळूणच्या नांदिवसे परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीची डरकाळी

चिपळूण:- कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात सोडलेल्या हिरकणी वाघिणीची डरकाळी नांदिवसेच्या (ता. चिपळूण) जंगलात ऐकू आली आहे. हिरकणीच्या एन्ट्रीमुळे नांदिवसे परिसरात उत्सुकतेसोबतच कुतूहल निर्माण झाले आहे. येथील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.

या संदर्भात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या ‘मॉनिटरिंग सेंटर’कडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला. बुधवारी सायंकाळी नांदिवसे गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पेच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेबुवारीला सायंकाळी पाच वाजता एसटीआर 06 या वाघिणीला पकडून कोयना अभयारण्यात सोडण्यात आले. त्यानंतर या वाघिणीचा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. या आधी एसटीआर 03 हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ व ‘चंदा’ या वाघिणी दाखल आहेत. आता त्यांच्या जोडीला नवीन आणलेली ही एसटीआर 06 म्हणजा ‘हिरकणी’ वाघीण कोयना वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रजननवृद्धीसाठी सोडण्यात आली आहे.

कोयना अभयारण्यात सोडलेल्या ‘हिरकणी’चा लोकेशन सिग्नल अवघ्या पाचव्या दिवशी नांदिवसेच्या डोंगराळ भागात आढळून आला. यानंतर मॉनिटरिंग सेंटरने चिपळूण वनविभागाला सावध केले. बुधवारी सायंकाळी वनाधिकाऱ्यांनी त्वरित पथकासह नांदिवसे येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी डोंगर परिसरात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्रीच्यावेळी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या.