Friday, May 8, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळुणात डॉक्टरच्या २२ वर्षीय मुलाची आत्महत्या

चिपळुणात डॉक्टरच्या २२ वर्षीय मुलाची आत्महत्या

चिपळूण:- शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय २२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असून, त्यांचे कुटुंब एकता अपार्टमेंटमध्ये राहते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी काळजी व्यक्त केली. शेवटी दरवाजा तोडून आत पाहिल्यावर ओवेसने लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे चित्र समोर आले. कुटुंबीयांनी तात्काळ घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आत्महत्या असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. त्याने नेमके कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत. ओवेसच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.