मद्याच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पाय वाटेने घराकडे येणाऱ्या पत्नीच्या पाठीमागून येवून दांडक्याने मारुन जखमी करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक कृष्णा सुतार (रा. खानू सुतारवाडी, रत्नागिरी) असे दुखापत करणाऱ्या पतीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बौद्धवाडी स्मशान भूमी येथे माळावर खानू येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. दिव्या दिपक सुतार (वय ३९, रा. खानू सुतारवाडी) या व संशयित नात्याने पती-पत्नी आहेत. पतीला मद्याचे व्यसन आहे. सौ. दिव्या सुतार या रविवारी सायंकाळी तावडे खानू फॉर्म येथून काम आटोपून घरी पाय वाटेने चालत येत असताना दबा धरुन बसलेला संशयित दिपक सुतार याने त्यांच्या पाठीमागून येवून कारण नसताना लाकडाच्या दांडक्याने तसेच हाताच्या थापटाने सौ. दिव्या हिस शिवीगाळ व मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी सौ. दिव्या सुतार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.