Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी भूसंपादनाच्या मोबदल्यासह स्थानिकांना टोलमाफी करा

भूसंपादनाच्या मोबदल्यासह स्थानिकांना टोलमाफी करा

अन्यथा टोल सुरू होऊ देणार नाही, आमदार किरण सामंत आक्रमक

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. “भूसंपादनग्रस्तांना न्याय आणि स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळाल्याशिवाय महामार्गावर टोल सुरू होऊ देणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना दिला आहे.

महामार्ग चौपदरीकरणासाठी कोकणातील हजारो शेतकरी आणि जमीनधारकांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, अनेक वर्षे उलटूनही अद्याप अनेक बाधितांना जमिनीचा पूर्ण मोबदला मिळालेला नाही. काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे प्रकरणे रखडली आहेत, तर कुठे अपूर्ण भरपाई मिळाल्याच्या तक्रारी आहेत. एकीकडे हक्काचा पैसा मिळालेला नसताना दुसरीकडे टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.

या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारताना आमदार सामंत म्हणाले, “ज्यांनी विकासासाठी स्वतःच्या जमिनींचा त्याग केला, त्यांना न्याय न देता टोलच्या नावाखाली त्यांच्यावर आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि व्यवसायासाठी स्थानिकांना दररोज या महामार्गाचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत स्थानिक गाड्यांना टोलमधून पूर्णतः वगळले पाहिजे अशी मागणी आमदार किरण सामंत यांनी केली आहे.


भूसंपादनग्रस्तांचे प्रलंबित पैसे तातडीने जमा करा अशी आग्रही मागणी आमदार किरण सामंत यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांना टोलमाफी देण्याबाबत शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या भावनांचा आदर करत कोणत्याही परिस्थितीत टोल नाका सुरू होऊ दिला जाणार नाही असा पवित्रा देखील आमदार किरण सामंत यांनी घेतला आहे.

हा लढा कोणत्याही राजकारणासाठी नसून केवळ सामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे. माझ्या मतदारसंघातील एकाही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
आमदार सामंत यांच्या या भूमिकेमुळे राजापूर-लांजा परिसरातील भूसंपादनग्रस्त आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आता शासन आणि महामार्ग प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.