रत्नागिरी:- शहराजवळील भाटीमिऱ्या येथे शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर अनंत कचरेकर, संतोष अनंत कचरेकर (दोघेही रा. भाटीमिऱ्या, रत्नागिरी) अशी संशयिताची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाटीमिऱ्या येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल निलेश भाटकर (वय २३, रा. भाटीमिऱ्या जूने दत्त मंदिर शेजारी, रत्नागिरी) व संशयित हे एकाच परिसरात राहतात. यातील संशयित चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसापासून गावीतील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना काही कारण नसताना शिवीगाळ करणे, भिती दाखवणे असे प्रकार करत असे. संशयित चंद्रशेखर याने फिर्यादी साहिल भाटकर यांचे आजोबा शंकर भाटकर हे घराशेजारी फुले काढत असताना तेथे येवून कुऱ्हाड दाखवून तुला ठार मारुन टाकेन असे बोलून शिवीगाळ केली. म्हणून फिर्यादी व साक्षिदार यांनी आजोबा शंकर भाटकर यांना तेथून बाजुला नेले. मात्र झटापटीत संशयित चंद्रशेखर यांच्या हातातील कुऱ्हाड फिर्यादी यांच्या पोटाला व साक्षीदार निलेश भाटकर यांच्या डाव्या हाताला लागून दुखापत झाली. त्यानंतर संशयित संतोष कचरेकर यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रखरणी साहिल भाटकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहे.









