Saturday, June 6, 2026
spot_img
Home गुहागर भरधाव स्कुटर अपघातात तरुणाचा मृत्यू

भरधाव स्कुटर अपघातात तरुणाचा मृत्यू

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-पिंपर फाटा रस्त्यावर झालेल्या भीषण स्कुटर अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विरेंद्र सुभाष घाडे (वय २४, रा. उंबराठ घाडेवाडी, ता. गुहागर, सध्या रा. सांताक्रूझ, मुंबई) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ मार्च रोजी रात्री ९:३० च्या सुमारास घडली. मयत विरेंद्र घाडे हा स्वतःची सुझुकी बर्गमन स्कुटर (क्रमांक MH 02 GF 0370) घेऊन बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा मार्गाने जात होता. मौजे वाडदई येथे आला असता, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता आणि भरधाव वेगात स्कुटर चालवल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला.

या अपघातात विरेंद्रच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तपास गुहागर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मयताचा पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, डॉक्टरांनी मृत्यूचे कारण ‘अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत’ असल्याचे स्पष्ट केले.
​यावरून, स्वतःच्याच निष्काळजीपणामुळे व भरधाव वेगामुळे स्वतःच्या मृत्यूला आणि मालमत्तेच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी, गुहागर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्वामिनी नाटेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा (गु.र.नं. ४८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये पुढील तपास सुरू आहे.