Monday, June 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बनावट सोन्याचे दागिने विकून लांजातील तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

बनावट सोन्याचे दागिने विकून लांजातील तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

संशयिताला रायगडमधून अटक, दोन लाखाची रक्कम पोलिसांनी केली जप्त

संगमेश्वर:- बनावट सोन्याचे दागिने खरे सोने असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र कुमार मोहनलाल परमार (रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ही. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून सुमारे २ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत दिलेश प्रकाश गुजर (रा. बेनी खुर्द, गुजरवाडी, ता. लांजा) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीनुसार, २० एप्रिल रोजी लांजा येथील एका कपड्यांच्या दुकानात काम करत असताना जितेंद्र परमार व त्याच्या साथीदाराने त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या गावात लग्न असल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत त्यांनी काही सोन्याचे दागिने विक्रीसाठी असल्याचे सांगितले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जोंधळी मणी असलेल्या दागिन्यांतील काही मणी तपासण्यासाठी दिले. ते खरे असल्याचे वाटल्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २८ एप्रिल रोजी संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात व्यवहार ठरवून जोंधळी मणी व सोन्याच्या तारेसारखा दिसणारा हार खरे सोने असल्याचे सांगत साडेतीन लाख रुपयांना विकण्यात आला. मात्र नंतर दागिने बनावट असल्याचे उघड झाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. संशयित रायगड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित जितेंद्र कुमार मोहनलाल परमार याला अटक करून त्याच्याकडून २ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.