लांजा:- २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लांजा येथील व्यापारी पराग चंद्रकांत राणे याला आज लांजा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
लांजा येथील किराणा मालाचा व्यापारी असलेल्या पराग राणे यांनी शनिवार दिनांक १५ जून रोजी लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये पाचशे रुपयांच्या ५१ नोटा अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून तसेच बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी १९ जून रोजी पोलिसांनी राणे याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवारी २१ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर पुन्हा पोलिसांनी पराग राणे याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.