पाचल:- राजापूर तालुक्यातील मिळंद येथील तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोतवाल आणि मंडळ अधिकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.
या प्रकरणातील आरोपी कोतवाल संजना नंदकुमार माने आणि मंडळ अधिकारी पुनम जयसिंग गावीत यांच्या विरोधात राजापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार, दि. १५ मे रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. यावेळी कोतवाल संजना माने यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. तर मंडळ अधिकारी पुनम गावीत यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप तपासात नमूद करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर दोन्ही आरोपी महिलांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ आणि १२ नुसार राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राजापूर तालुक्यातील या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.









