Tuesday, October 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बंद घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

बंद घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

मंडणगड:- तालुक्यातील तुळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

मूळचे तुळशी येथील रहिवासी असलेले लखन परशुराम मोहिते (वय ३३) हे नोकरीनिमित्त सध्या आपल्या कुटुंबासह हिंजवडी फेज १, पुणे येथे वास्तव्यास आहेत. गावातील त्यांचे घर बंद अवस्थेत होते. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लखन मोहिते यांची बहीण घराची साफसफाई करण्यासाठी गेली असता, तिला घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटे उचकटलेली आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ ही माहिती लखन मोहिते यांना कळवली. त्यानंतर मोहिते यांनी तातडीने पुण्यातून गावी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात मोठी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

अज्ञात चोरट्यांनी २० सप्टेंबर सायंकाळी चार ते ८ ऑक्टोबर सकाळी साडेदहा या कालावधीत घराच्या मुख्य दरवाजाचा लोखंडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख रुपये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, सुमारे पाच हजार रुपयांची जुनी तांब्या-पितळेची भांडी (ज्यामध्ये तांबे, ताट, टोप आणि डब्यांचा समावेश आहे) तसेच वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी लखन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) (तसेच भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बंद घरांची रेकी करून ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मंडणगड पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.