Saturday, June 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला जीवे मारण्याची धमकी

पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला जीवे मारण्याची धमकी

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील भेलसई येथे एका महिलेला पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे न घेतल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच ग्रामसभेत बदनामी करण्याची धमकी देऊन कुटुंबालाही जीवे मारण्याची भीती घालण्यात आली.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरी असताना प्रमोद पांडुरंग कदम, शंकर गणु धाडवे, विजय संभाजी कदम, आनंद शंकर कदम, अशोक रामचंद्र कदम, कृष्णा नाना कदम, संदीप गोविंद कदम, विनोद यशंवत कदम आणि भार्गव नाना कदम यांनी फिर्यादीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला.

आरोपींनी फिर्यादीला धमकावले की, प्रमोद कदम याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार त्वरित मागे घे, अन्यथा तुझी ग्रामपंचायत भेलसई येथील नोकरी घालवू. यावेळी प्रमोद कदम याने सर्वांसमक्ष आक्षेपार्ह वक्तव्य करत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता आरोपींनी पुन्हा फिर्यादीला कृष्णा कदम याच्या घरी बोलावले. तिथेही पुन्हा तक्रार मागे घेण्यावरून दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे न घेतल्यास तुझ्या कुटुंबीयांना बघून घेऊ आणि तू नोकरीवर कशी येते तेच आम्ही पाहतो, अशी धमकी देण्यात आली. तसेच, ग्रामसभेत तुझी बदनामी करू, असे सांगून मानसिक त्रास दिला.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कायदा कलम १८९(२), १९०, ३२९(४) आणि ३५२(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.