Thursday, June 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पोचरीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताला अटक

पोचरीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताला अटक

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

संगमेश्वर:- घरच्या एकांताचा गैरफायदा घेऊन एका ३५ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरकृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील पोचरी येथे घडली असून याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मुकेश मोहन देसाई (वय ३५ वर्षे, रा. पोचरी, मधलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून याप्रकरणी पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना सोमवार, दिनांक १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पोचरी, मधलीवाडी येथील फिर्यादीच्या राहत्या घरात घडली. पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना, आरोपी मुकेश देसाई याने तिच्या एकांताचा गैरफायदा घेतला. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, आरोपीने वाईट हेतूने तिला आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्या शरीराला व गुप्तभागाला स्पर्श करत अश्लील गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर बुधवार, दिनांक ३ जून रोजी संध्याकाळी ७:३६ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली.

संगमेश्वर पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी मुकेश देसाई याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. ६५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ पोक्सोचे कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आणि नुकतीच आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. महिला सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. एस. तांबडे यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.