Friday, June 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावसाचा यलो अलर्ट, रत्नागिरीत उन्हाचा पारा वाढला

पावसाचा यलो अलर्ट, रत्नागिरीत उन्हाचा पारा वाढला

दोन दिवसांपासून पावसाची पाठ; शेतीच्या कामांचा खोळंबा

रत्नागिरी:- मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मागील दोन दिवसांपासून काहीशी पाठ फिरवल्याच चित्र आहे. बुधवारी जिल्हाभरात किरकोळ सरींनी हजेरी लावली तर गुरुवारी दिवसभर कडक उन्हाने नागरिकांना घामटा फोडला. पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

यावर्षी पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्हाभरात मान्सूनने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह सर्वदूर पाऊस दाखल झाला. दोन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजाच्या शेतीच्या कामांनी देखील वेग पकडला. जिल्हाभरात भात पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली. दोन दिवस सलग कोसळणाऱ्या पावसाने उकाड्यापासून सुटका झाली आणि तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याने जिल्ह्यातील पाणी टंचाईचा विषय काही अंशी मार्गी लागला होता.

मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात 1.33 च्या सरासरीने केवळ 11.95 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने किरकोळ हजेरी लावली तर गुरुवारी सर्वत्र कडक ऊन पडल्याने पुन्हा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्या प्रमाणे वातावरण होते. दिवसभर नागरिकांना घामाच्या धारांनी व्याकुळ केले. पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामात खोळंबा झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने पेरणीच्या कामाने जोर पकडला होता मात्र आता पाऊस गायब झाल्याने पेरणीच्या कामे खोळंबली आहेत. दरम्यान शुक्रवारी देखील पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. पाऊस पडू दे आणि शेतीची कामे मार्गी लागू दे अशी प्रार्थना शेतकरी राजा करत आहे.