पालशेत बाजारपेठेत बियर बारबाहेर हाणामारी

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुहागर:- तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील ‘हॉटेल गारवा बियर बार’मध्ये किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. एका ५२ वर्षीय मच्छिमाराला दगड आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद गोपाळ पालशेतकर (वय ५२, रा. पालशेत जाईलवाडी) हे १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास आपल्या भाच्यासोबत हॉटेल गारवामध्ये बसले होते. यावेळी आरोपी प्रेमनाथ अंकुश पटेकर याने फिर्यादींना धक्का मारला. फिर्यादींनी विचारणा केली असता, “मी जाणूनबुजून धक्का मारला, तुला काय करायचे आहे ते कर,” असे म्हणत आरोपीने शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली.

​वाद वाढल्यानंतर फिर्यादी बारबाहेर पडून आपल्या मोटारसायकलवर बसले होते. यावेळी आरोपी साहिल सीताराम पटेकर याने जमिनीवरील दगड उचलून फिर्यादींच्या डोक्यात फेकून मारला, ज्यामुळे त्यांना रक्तबंबाळ जखम झाली. त्यानंतर आरोपी प्रेमनाथ पटेकर याने हातातील लाकडी बांबूने फिर्यादींच्या डोक्यावर, पाठीवर आणि कमरेवर वार करून त्यांना खाली पाडले. खाली पडल्यानंतर आरोपी चिंतामणी गणू पटेकर याच्यासह तिघांनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
​मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही धक्काबुक्की
​मारहाण सुरू असताना फिर्यादींची बहीण आणि भावजय त्यांना वाचवण्यासाठी आल्या. मात्र, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. महिलांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली.

​या प्रकरणी प्रमोद पालशेतकर यांनी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रेमनाथ पटेकर, साहिल पटेकर आणि चिंतामणी पटेकर यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), १२५(अ), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
​या घटनेमुळे पालशेत बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.