पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला तीन हजारांचा दंड

देवरूख:- क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देवरूख न्यायालय परिसरात घडली होती. या प्रकरणाचा निकाल लागला असून, न्यायाधीशांनी पतीला तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मंगेश शंकर बारगुडे यांनी १८ डिसेंबर २०१७ रोजी पत्नी साक्षी बारगुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. साक्षी बारगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगेश बारगुडे याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. हा निकाल लागला असून, न्यायाधीश बी. डी. तारे यांनी मंगेश बारगुडे याला तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून सुप्रिया वनकर, ए. एल. दड्डेकर, प्रभारी अधिकरी म्हणून पोलिस निरीक्षक अतुल जाधव, तपासिक म्हणून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, कोर्ट पैरवी म्हणून एम. आर. बोंद्रे यांनी काम पाहिले.