Tuesday, August 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी एमआयडीसीसाठी 120 कोटींच्या निधीला मंजुरी

निवेंडी एमआयडीसीसाठी 120 कोटींच्या निधीला मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूसंपादनात निर्माण झालेला निधीचा मोठा अडसर आता पूर्णपणे दूर झाला आहे. ९५ हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी लागणारा १२० कोटी रुपयांचा संपूर्ण निधी जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून निधीच्या तुटवड्यामुळे रेंगाळलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आता वेगाने पुढे सरकणार असून प्रशासकीय स्तरावर भूसंपादन आणि भरपाई वाटपाच्या प्रक्रियेला तीव्र वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी निवेंडी पंचक्रोशीत एमआयडीसी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला १०५ हेक्टर जमिनीचे नियोजन करून मोजणी आणि प्राथमिक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. नंतरच्या टप्प्यात ९५ हेक्टर क्षेत्रावर ही एमआयडीसी उभारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, मध्यंतरीच्या काळात आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने भूसंपादनाचे काम ठप्प पडले होते.
शासनाकडून पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपये प्राप्त झाले होते. आता उर्वरित ६० कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाल्याने एकूण १२० कोटी रुपयांची तरतूद पूर्ण झाली आहे. निधीचा पूर्ण प्रश्न सुटल्याने आता प्रत्यक्ष जमीनधारकांना भरपाईचे वाटप करून जमिनीचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या निधीचा तिढा सुटला आहे. कोकणातील समृद्ध आंबा, काजू आणि इतर फलोत्पादनावर (कोकणी मेवा) स्थानिक पातळीवरच प्रक्रिया करणारे मोठे उद्योग या एमआयडीसीत आणले जाणार आहेत.