पाचल:- पाचल येथे पेट्रोलिंग करत असताना राजापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे नाटे पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात चोरीला गेलेली होंडा शाईन (MH 07 AK 8170) दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचल बाजारवाडी परिसरात पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत गस्त घालत असताना, रोडच्या बाजूला एका गवताच्या शेतात बंद अवस्थेत एक होंडा शाईन कंपनीची दुचाकी (क्र. MH 07 AK 8170) आढळून आली.
याची माहिती तत्काळ राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षकांनी सदर दुचाकीच्या क्रमांकावरून अधिक तपास केला असता, ती नाटे पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील चोरीची असल्याचे समोर आले.
यानंतर ही माहिती नाटे पोलीस ठाण्याला कळवण्यात आली. माहिती मिळताच नाटे पोलीस स्टेशनचे कर्मचारी पाचल येथे दाखल झाले आणि त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्ह्यातील दुचाकी आपल्या ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी नाटे येथे रवाना केली.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस कर्मचारी आणि यांनी दिलेल्या सहकार्यामुळे गुन्ह्यातील मालमत्ता परत मिळवण्यात यश आले. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा तपास मार्गी लागला आहे.