Tuesday, June 30, 2026
spot_img
Home संगमेश्वर आरवली येथील अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

आरवली येथील अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:- नालासोपारा येथील ३७ वर्षीय तरुणाचा कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे प्रदीर्घ उपचारानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित दत्ताराम चांदणे (वय ३७, रा. साईनाथनगर, नालासोपारा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित चांदणे हे आपल्या कुटुंबासमवेत (आई दिपाली चांदणे, दिपक पवार, ज्योती पवार आणि मुलगी हर्षिला चांदणे) कारने आपल्या राहत्या घरून लांजाकडे प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान, दि. १६ मे रोजी आरवली (ता. संगमेश्वर) परिसरात त्यांची कार अचानक पलटी झाली. या भीषण अपघातात रोहित चांदणे यांच्या चेहऱ्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतर त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे चांदणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.