Wednesday, July 1, 2026
spot_img
Home संगमेश्वर शास्त्री नदीच्या पात्रात दोन कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

शास्त्री नदीच्या पात्रात दोन कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

राई भातगाव पुलाखाली अनोळखी पुरुषाचे प्रेत; दोन दिवसांपूर्वी सापडला होता बेपत्ता महिलेचा मृतदेह

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी भाग परिसरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेले मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेढे तर्फे फुणगुस येथे एका अज्ञात पुरुषाचा, तर डिंगणी रेती बंदर परिसरात परचुरी येथील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह अत्यंत दुरवस्थेत सापडला होता . फुणगुस खाडी भागातील याच नदीपात्रात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने हे दोन मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मांजरे गावचे पोलीस पाटील दीपक कमलाकर सावंत यांच्याकडे मेढे तर्फे फुणगुस गावचा अतिरिक्त पोलीस पाटील म्हणून कार्यभार आहे. मंगळवार, दिनांक ३० जून रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फुणगुस खाडी भाग परिसरातील मेढे येथील शास्त्री नदीत, राई भादगाव पुलाच्या खाली पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा मृतदेह एका अनोळखी पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे आहे. मृतदेह पाण्यात बरेच दिवस राहिल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ३० जून रोजी रात्री १० वाजता नोंदवण्यात आला असून पोलीस या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे, ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच फुणगुस खाडी परिसरातील डिंगणी येथील रेती बंदर भागात आणखी एका मृतदेहाचा शोध लागल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती. हा मृतदेह परचुरी येथील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले होते, जी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध नातेवाईक आणि पोलीस घेत असतानाच, दोन दिवसांपूर्वी तिचा अंत असा खाडीच्या पाण्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परचुरी परिसरावर आधीच शोककळा पसरली आहे. त्यातच आता पुन्हा दोन दिवसांनी याच खाडी भागात पुलाखाली अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडल्याने खळबळ अधिकच वाढली आहे.

फुणगुस खाडी भाग परिसरात लागोपाठ दोन मृतदेह सापडल्याने संगमेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांसमोर आता त्या अनोळखी पुरुषाची ओळख पटवण्याचे आणि परचुरीतील महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही मृतदेह पूर्णपणे कुजलेले असल्याने मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. संगमेश्वर पोलीस या दोन्ही प्रकरणांचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून, गेल्या काही दिवसांत परिसरातून कोणी पुरुष बेपत्ता झाला असल्यास नागरिकांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.