पाग परिसरातील घटना
चिपळूण:- आपली मोटारसायकल वापरण्यास दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी पाईपने भीषण हल्ला केल्याची घटना चिपळूणमधील पाग पॉवर हाऊस परिसरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हातापायांना फ्रॅक्चर झाले आहे.
कापसाळ मोरेवाडी येथील रहिवासी श्रीकांत श्रीपत सावंत (४५) हे २७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाग येथील ‘श्री धाडवे’ यांच्या वेल्डिंग दुकानात एका ट्रकचे काम करण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे असलेल्या आरोपी राकेश गोरिवले याने सावंत यांच्याकडे त्यांची मोटारसायकल मागितली. मात्र, सावंत यांनी गाडी देण्यास नकार दिला.
गाडी दिली नाही या रागातून आरोपी राकेश गोरिवले याने श्रीकांत सावंत यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर आणि पायांवर पाईपचे जोरात प्रहार केले. या हल्ल्यात सावंत यांच्या डाव्या दंडाला, उजव्या खांद्याला आणि उजव्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर झाले आहे, तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने टाके घालावे लागले आहेत. मारहाण करताना आरोपीने शिवीगाळ करत त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली.
घटनेनंतर काही दिवसांनी, २ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११७(२), ११८(१) , ३५२, ३५१(३) कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









