दापोलीत भरदिवसा दुचाकीची चोरी

रसिकरंजन नाट्यगृह परिसरातील घटना

दापोली:- दापोली शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, रसिकरंजन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र काशिनाथ चव्हाण (वय ४०, रा. जालगाव, दापोली) हे व्यावसायिक कंत्राटदार आहेत. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस १२५ दुचाकी (क्रमांक: MH 08 AS 8996) रसिकरंजन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या श्री समर्थ अर्थमव्हर्स या दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती.
​काही वेळाने ते परतले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या संमतीशिवाय ही दुचाकी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

या चोरीबाबत जितेंद्र चव्हाण यांनी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या या जुन्या वापरत्या दुचाकीची किंमत अंदाजे ६०,००० रुपये इतकी आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. भरवस्तीतून दुचाकी चोरीला गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.