Tuesday, June 23, 2026
spot_img
Home चिपळूण ‘त्या’ दोन मुलींचा मृत्यू विषबाधेने

‘त्या’ दोन मुलींचा मृत्यू विषबाधेने

अंतिम अहवाल राखून ठेवला; पोलिसांकडून अनेक जणांची चौकशी

चिपळूण:- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे; मात्र याबाबतचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला असून, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे. दुसरीकडे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची कसून चौकशी सुरूच ठेवली आहे.

मंगल मनोहर वाघे (१५) आणि सुप्रिया यशवंत वाघे (१४) या दोन्ही बहिणी शेळ्यांना चारून घरी आल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकाच ठिकाणी दोघीही मृतावस्थेत आढळल्याने तिच्या कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांनाही तितकाच मोठा धक्का बसला. या घटनेनंतर तत्काळ दोघींचे मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेऊन विच्छेदन करण्यात आले. त्यानुसार प्राप्त झालेल्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात दोघींचाही मृत्यू विषबाधेतून झाल्याचे उघड झाले आहे; परंतु याबाबतचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.

येत्या काही दिवसात व्हिसेरा अहवाल प्राप्त होणार असून, त्यामध्ये त्यांच्या मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणात घातपात झाल्याची शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने काहींची चौकशी करून त्यांचे जाबजबाब घेतले जात आहेत. या प्रकरणी अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील हे करत आहेत.