Saturday, June 20, 2026
spot_img
Home लांजा तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू

तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू

लांजा:- घरात टीव्ही पाहत असताना शोकेसचा आधार घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन पडल्याने एका २४ वर्षीय अपंग तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता दीपक दिवाळे (वय २४, रा. कोट पाष्टेवाडी) ही तरुणी जन्मापासूनच शारीरिकदृष्ट्या अपंग होती. तिला दम्याचा आणि पित्ताचाही त्रास होता. शारीरिक व्याधींमुळे ती घरात भिंतीचा आधार घेऊन चालत असे.
​सोमवारी सायंकाळी ७ वाजता नम्रता घरात टीव्ही पाहत होती. टीव्ही पाहत असताना शोकेसला धरून उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाली.

​नम्रता बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने एका खाजगी गाडीतून उपचारासाठी सापुचेतळे येथील डॉ. साउळवाडे यांच्या दवाखान्यात नेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने तिला तातडीने वाडिलिंबु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे घोषित केले.

​या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:०६ वाजता या घटनेची रीतसर नोंद करण्यात आली. या घटनेमुळे कोट पाष्टेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.