तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न उधळला

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे दोन भामटे गजाआड

रत्नागिरी:- तुतारी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले सचिन सावेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. एस २, एस ३ व एस ४ या डब्यांमध्ये १६ फेब्रुवारी रोजी ट्रेन क्रमांक ११००४ कार्यरत असताना ट्रेन रोहा स्थानक ओलांडल्यानंतर एस२ कोचमध्ये दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत श्री. सावेकर यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्या दोघांना एस ८ कोचमधून पकडून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी एका महिला प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली. झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मंगळसूत्र, कानातले, बुगडी, ४,७५० रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल असा मुद्देमाल सापडला. ही घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तात्काळ निर्णयक्षमता दाखवत श्री. सचिन सावेकर यांनी दोन्ही संशयितांना रेल्वे संरक्षण दल पनवेलकडे सुपूर्त केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. सावेकर यांचे रेल्वे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचे सीएमडी (केआरसीएल) यांनी त्यांच्या कामाचे अभिनंदन करत १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच संचालक व विभागप्रमुखांनीही त्यांच्या धाडसपूर्ण आणि सतर्क कामगिरीचे कौतुक केले आहे.