Saturday, June 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा ऐनवेळी स्थगित

‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा ऐनवेळी स्थगित

रत्नागिरीतील ६,६२२ उमेदवारांचा हिरमोड

रत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचा संशय बळावल्याने राज्य परीक्षा परिषदेने एक मोठा निर्णय घेत २८ जून रोजी होणारी ही परीक्षा तूर्तास स्थगित केली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीसह राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात या परीक्षेसाठी १२ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यासाठी ६,६२२ शिक्षक आणि उमेदवारांनी परीक्षेची जय्यत तयारी केली होती. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील ३,३८३ शिक्षकांचा समावेश असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांच्या नोकरीच्या दृष्टीने बंधनकारक आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने या शिक्षकांसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिवंडी येथील केंद्रावरून परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता धोक्यात आल्याचे पाहून राज्य परीक्षा परिषदेने तातडीने बैठक घेतली. परीक्षेची विश्वासार्हता जपण्यासाठी २८ जून रोजी होणारे दोन्ही पेपर ऐनवेळी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने परीक्षेच्या नियोजनासाठी कंबर कसली होती. सर्व १२ केंद्रांवर सीसीटीव्ही, बायोमेट्रिक यंत्रणा आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या या सर्व तयारीवर पाणी फिरले असून, परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र संताप आणि निराशेचे वातावरण आहे.

सध्या या पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि नवीन वेळापत्रक लवकरच राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या गोंधळामुळे शिक्षक आणि उमेदवारांना आता पुढील घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.