Thursday, May 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी झाडगाव एमआयडीसी मधील 50 बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच बुलडोझर

झाडगाव एमआयडीसी मधील 50 बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच बुलडोझर

एमआयडीसीकडून अखेरची नोटीस, 28 मे ला कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसी परिसरातील बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अखेरच्या नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम हटवण्यासाठी संबंधितांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २८ मे रोजी येथील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवला जाणार आहे. कारवाई थांबवली जाऊ नये यासाठी एमआयडीसीने आधीच न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे.

झाडगाव एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चिऱ्याचे बांधकाम, बेकायदेशीर वीज जोडण्या करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या संदर्भात एमआयडीसीने संबंधितांना दिलेली ही तिसरी आणि अंतिम नोटीस आहे. यापूर्वीच त्यांना अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामे न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मंगळवारी बजावण्यात आलेल्या अंतिम नोटिसीनंतर आता संबंधित अतिक्रमणधारकांना केवळ ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा कालावधी संपताच २८ मे ला कडक पोलिस बंदोबस्तात ही सर्व बांधकामे पाडण्यात येणार असून, त्यासाठी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना आधीच संरक्षणाचे पत्र देण्यात आले आहे.

मंगळवारी जेव्हा एमआयडीसीचे कर्मचारी या नोटिसांचे वाटप करण्यासाठी घटनास्थळी गेले, तेव्हा स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या एका स्वयंघोषित पुढाऱ्याने या शासकीय प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. “अधिकारी स्वतः नोटीस द्यायला का आले नाहीत?” असा उद्दट प्रश्न विचारत या पुढाऱ्याने कर्मचाऱ्यांशी आरेरावीची भाषा केली, ज्यामुळे काही काळ झाडगाव एमआयडीसी परिसरात वातावरण कमालीचे तापले होते. प्रत्येक बेकायदेशीर बांधकामधारकाकडून आर्थिक लाभ (पैसे) घेऊन या अनधिकृत कृत्यांची पाठराखण करण्याचा आणि आपली नेतेगिरी चमकावण्याचा या स्वयंघोषित पुढाऱ्याचा डाव असल्याचे उघड झाले आहे.