सोमवारी संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे.महावितरण विभाग आणि नगर परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त नियोजित कामांमुळे सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ जॅकवेल येथील वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे.याच कालावधीचा उपयोग करून नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागानेही आपली प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीची कामे एकाच दिवशी पूर्ण करण्याचे ठरवले आहे.दोन महत्त्वाच्या विभागांची कामे एकाच वेळी होणार असल्याने सोमवारी नळांना पाणी येणार नाही.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी शहरवासीयांना खालील आवाहन केले आहे.सोमवारी पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी रविवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा.

दुरुस्तीच्या कामात आणि पाणी बचतीच्या मोहिमेत नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे. मंगळवारपासून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता असली, तरी कमी दाबाने पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आगाऊ नियोजन करावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.