Friday, June 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; मासेमारी ठप्प

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; मासेमारी ठप्प

नद्या, नाले तुडुंब; समुद्राला उधाण

रत्नागिरी:- मागील दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा किनार्यावर आदळत होत्या.त्यामुळे किनाऱ्यानजिकच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. मिऱ्या, पंधरामाड परिसरात लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वीच मासेमारी सुरु झालेली असतानाही असंख्य नौका मिरकरवाडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे मिरकरवाडा बंदर हाऊसफुल्ल झाले आहे.

यावर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मुसळधार कोसळल्यानंतर जून महिन्यात पावसाची बऱ्यापैकी हजेरी होती. जुलै महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. विना उसंत कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान देखील केले आहे. पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. तर पावसाचा परिणाम समुद्रातही जणवू लगाला आहे.

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनार्यावर आश्रयाला आल्या आहे. खोल समुद्रात उंच लाट उसळत असल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी नौकांसह किनार्यावर आश्रय घेतला आहे. त्यामुळे मासेमारी पु्र्णत: ठप्प झाली आहे. जाकिमिऱ्या, पंधरामाड समुद्र किनारीही लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. लाटा जोरदारपणे किनार्यावर आदळत आहेत.

पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. लावणीची कामे आटपून समाधाकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले आहे. जुलै महिन्यात उघडीप दिल्याने भातावर करपा रोग पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे भाताची वाढ झटपट होईल असे मत शेतकऱ्यांचे आहे.

मासेमारी पुर्णत: ठप्प झाल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्रिवर परिणाम झाली आहे.श्रावण महिना सुरु झाल्याने मस्त्य खवय्यांची संख्या कमी आहे. मात्र तरीही अनेक मत्स्यप्रेमी मच्छि खरेदीसाठी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. अनेकांना रिकामी हाती परत जावे लागत आहे. तर किनार्या लगत मासेमारी करणार्या नौकांमुळे उपलब्ध होणाऱ्या मच्छिला सोन्याचा दर आला आहे. पापलेट सहाशे रु.किलोने, तर बोंबील २०० रु. किलोने विक्रिला जात आहे.