Saturday, May 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात दारूबंदी, जुगार कायद्यांतर्गत चौघांवर गुन्हे दाखल

जिल्ह्यात दारूबंदी, जुगार कायद्यांतर्गत चौघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्याच्या विविध भागांत अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. यामध्ये खेडशी, राजापूर, संगमेश्वर आणि दापोली परिसरात दारूबंदी आणि जुगार कायद्यांतर्गत एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोख रक्कमेसह अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेडशी-गयाळवाडी रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ पोलिसांनी कारवाई केली. मिरजोळे (जांभळफाटा) येथील रहिवासी प्रवीण बाचराव मजगांवकर (३२) हा कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना मिळून आला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या पथकाने राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली-पानेरे रोडवर ही कारवाई केली. आंब्याच्या झाडाखाली अवैध रित्या ७ लिटर गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्या प्रकरणी नितीन लहु परकर (४६, रा. दळे लासेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

​संगमेश्वर तालुक्यातील मुचरी (मोरेवाडी) येथे घराच्या मागील शेडमध्ये विक्रीच्या उद्देशाने गावठी दारू बाळगल्या प्रकरणी सत्यवती शांताराम मोरे (७०) या वृद्धेवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २००० रुपये किमतीची १५ लिटर हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. संगमेश्वर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार ही कारवाई केली.

​दापोली तालुक्यातील दाभोळ येथील लोकमान्य टिळक परिसरात एका बंद पान टपरीच्या बाजूला बेकायदा मटका जुगार खेळवणाऱ्या यासीन इस्माईल मुगाये (४८, रा. तांबडी मोहल्ला) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे देवानंद बोरकर यांनी ही कारवाई केली. आरोपीकडून ३३० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवला आहे.